हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबतचा अभ्यास ‘लांसेट’ने घेतला मागे


मुंबई : हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबतचा यापूर्वी जाहीर केलेला आपला अभ्यास लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने मागे घेतला असून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबतचा लांसेटने आपला अभ्यास चुकीचा असल्याचे मान्य केले आहे. अशी घटना लांसेटच्या 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्यामुळे लांसेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत लांसेटने काल एक निवेदनात जारी केले आहे. संशोधनातील तपशील या निवेदनात देण्यात आले आहेत. 22 मे रोजी संबंधित संशोधन प्रकाशित झाले होते. त्यात 6 खंडांतील रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनाच्या 96 हजार रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले होते. मृत्यूचे प्रमाण एचसीक्यू किंवा क्लोरोक्वीनच्या वापरामुळे वाढल्याचे, काही रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल झाल्याचे आढळून आल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. पण या संशोधनातील अनेक तपशील जुळत नसल्यामुळे 100 हून अधिक वैज्ञानिकांनी लांसेटकडे आक्षेप नोंदवले होते. लांसेटने त्यावर दुसरा अभ्यासगट नियुक्त केला होता. या गटाच्या अहवालानंतर लांसेटनी आपला अभ्यास मागे घेतला आहे.

‘कोविड-19च्या उपचारात मॅक्रोलाईडसह किंवा शिवाय एचसीक्यू अथवा क्लोरोक्वीन घेणे : एक बहुराष्ट्रीय आकलन’ असा शोधनिबंध सादर करण्यात आला होता. या संशोधनातील संशोधकांपैकी तीन संशोधक भारतीय होते. 6 खंडातील 6 हजार 71 रूग्णालयांचा या कथित संशोधनासाठी अभ्यास केला गेल्याचा दावा होता. यासाठी 81 हजार पेशंटचा अभ्यास केला गेला, ज्यांना एचसीक्यू दिले नव्हते. तर 15 हजार रूग्णांना एचसीक्यू औषध दिले होते. त्यांच्या निष्कर्षातून कोविडच्या उपचारात एचसीक्यू हे औषध मदत करत नाही. उलट रूग्णांचा हृदयाचे ठोके अनियमित होऊन मत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होतं.

वैज्ञानिकांनी अशा विश्लेषणानंतर या औषधांमुळे कोरोनाग्रस्तांना वाचवण्याचे प्रमाण घटण्याची भीती व्यक्त केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वैद्यकीय चाचणीत रुग्णांवर ‘एचसीक्यू’ चा वापर करण्यास मनाई केली होती. पण, जगभरातील 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी ‘लांसेट’चे संपादक रिचर्ड होर्टन यांना खुले पत्र लिहून या संशोधनावर आक्षेप घेतल्यानंतर गेल्या मंगळवारी ‘लांसेट’ने या संशोधनावर चिंता व्यक्त केली होती. अभ्यासाचे तपशील देण्यास संशोधन करणाऱ्या सर्जिस फिअर या कंपनीला सांगण्यात आले होते. पण आपल्या संशोधनाचा आधार असलेली आकडेवारी कंपनीने दिली नाही.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी या औषधाचा वापर होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितल्यानंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस आरोग्य संघटनेने मागे घेतली आहे.

Leave a Comment