वर्णभेदाविरुद्ध मैदानात उतरला क्रिकेटचा देव; शेअर केला 2019च्या विश्वचषकातील तो व्हिडीओ


क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्णभेदाविरुद्ध सोशल मीडियावर आवाज उठवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिनने आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 2019 च्या अंतिम सामन्यातील व्हिडिओ शेअर केला आहे. 2019 मध्ये क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला. अटीतटीच्या या सामन्यात इंग्लंडचा कृष्णवर्णीय गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सुपरओव्हर टाकत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

यापूर्वी देखील आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करत, विविधते शिवाय क्रिकेट काहीच नाही. विविधतेशिवाय आपल्याला संपूर्ण चित्र कळत नाही, असे म्हटले होते. तोच व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत सचिन तेंडुलकरने नेल्सन मंडेला यांचा एक विचार मांडला आहे. जगाला बदलण्याची क्षमता खेळामध्ये आहे. जगाला एकत्र आणण्याची ताकद खेळामध्ये आहे आणि अशी ताकद खूप गोष्टींमध्ये असते.


दरम्यान अमेरिकेतील Black Lives Matter या मोहिमेचे जगभरातील विविध क्रीडापटूंनी समर्थन केले आहे. अमेरिकेतील 46 वर्षीय कृष्णवर्षीय जॉर्ज फ्लायड याच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये Black Lives Matter या आंदोलनाला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने देखील आयसीसीला वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आयसीसीने विश्वचषक 2019 स्पर्धेतील अंतिम सामन्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

Leave a Comment