कोरोनाबाधितांच्या संख्येत इटलीला मागे टाकत सहाव्या स्थानावर भारत


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बरेच निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल कोरोनामुळे २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एवढे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्याचबरोबर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ कोरोनाबाधित आहे, तर हीच संख्या भारतात दोन लाख ३६ हजार ११७ आहे. भारतात कोरोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे. दूसरीकडे देशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रात कोरोनामुळे शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत २४३६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ८०,२२९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. राज्यात काल १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. काल १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८४९ जणांचे बळी गेले आहेत. सध्या राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे.

Leave a Comment