देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका


मुंबई – विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला ना अर्थ, ना तत्त्व आणि मूल्यही नसल्याची म्हणत पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. आता केंद्राने घाईनेच लॉकडाउन केल्याचे म्हटले जात आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा शिवसेनेच्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

आमच्यासोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती, त्यांनी तेव्हाही विरोधी पक्षाचेच काम केले. ते एका भूमिकेवर ठाम राहिले तर ठीक होते. पण त्यांचे रोज भूमिका बदलण्याचे धोरण होते. एक दिवस म्हणायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. तर कधी राज्यपालांना नाव ठेवायचे, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करण्याचे शिवसेनेचे धोरण आहे, त्यांच्या टीकेला ना अर्थ, ना तत्त्व आणि मूल्य नाही. राज्यात आज कोरोनामुळे स्थिती वाईट होत चालली आहे. पण राज्यात दररोज जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नाहीत. देशाच्या सर्वात आधी महाराष्ट्राने लॉकडाउन पुकारला. मग लॉकडाउनची घाई कुणी केली? आम्हाला देश फॉलो करतो आहे, अशा जाहिराती तेव्हा केल्या आणि आता यांना त्याचा विसर पडल्यामुळे केंद्राने लॉकडाउन करताना घाई केली अशी ओरड केली जात असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत, असे काही नाही, त्या फक्त घोषणा आहेत. जेव्हा श्रमिक ट्रेन सुरु केल्या नव्हत्या आणि मजूर पायी चालले होते, तेव्हा आपल्या डोक्यावरचा धार कमी होत आहे असे या सरकारचे धोरण होते. स्थलांतरित मजुरांची काळजी त्यावेळी घेतली गेली नाही. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीतही मी त्यांना सल्ला दिला होता, की जे पायी जाणारे मजूर आहेत त्यांना थांबवा.

तीन पक्षांच्या सरकारला पॉलिसी लकवा मारला आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. ते त्यावर म्हणाले, कोणताही ताळमेळ आणि समन्वय तीन पक्षांच्या सरकारमध्ये नाही. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशीही या तीन पक्षांचा समन्वय नसल्यामुळे ठाकरे सरकारला पॉलिसी लकवा तर झाला आहेच पण या सरकारला अॅक्शन लकवाही झाला आहे.

Leave a Comment