अनलॉक 1 : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्राची नियमावली


नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील कोरोनाचा वाढता पार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता तब्बल दोन महिन्यांनंतर केंद्राकडून लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण काही नियम व अटी यासाठी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. ग्राहकाने यात स्वतःच्या मेडिकल व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

हॉटेलसाठीची नियमावली

  • हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या ग्राहकाने आपली मेडिकल हिस्ट्री व ट्रॅव्हल हिस्ट्री याची माहिती देणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर हॉटेलमधील वॉशरुम स्वच्छ ठेवण्यात यावे.
  • हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावा. त्याचबरोबर वयस्कर कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना लोकांच्या संपर्कात येण्यापासून टाळावे.
  • त्याचबरोबर सरकारकडून हॉटेलमधील एसी सुरू ठेवण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार हॉटेलमधील तापमान संतुलित ठेवण्यासाठी एसी २४ ते ३० डिग्रीमध्ये ठेवावा. त्याचबरोबर ४० ते ७० आद्रता राहिल याची काळजी घ्यावी.

रेस्टॉरंटसाठीची नियमावली

  • खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणाऱ्या बॉयने हातात पार्सल देणे टाळावे. त्याऐवजी दरवाज्यावर किंवा टेबलावर पार्सल ठेवावे.
  • रेस्टॉरंटमधील एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा. त्यामध्ये सोशल डिस्टसिंगचं पालन केले जावे.
  • रेस्टॉरंटमधून ग्राहक गेल्यानंतर ज्या ठिकाणी तो बसला आहे, ती जागा सॅनिटाइज करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment