लॉकडाऊन उठवल्यामुळे ब्राझीलमध्ये एकाच दिवसात आढळले ३० हजारांहून जास्त कोरोनाबाधित - Majha Paper

लॉकडाऊन उठवल्यामुळे ब्राझीलमध्ये एकाच दिवसात आढळले ३० हजारांहून जास्त कोरोनाबाधित


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना ब्राझीलसारख्या मोठ्या देशामध्ये पहिल्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही मर्यादितच होती. पण आता कोरोनाने ब्राझीलमध्येही उग्र रुप धारण करायला सुरुवात केली आहे. ब्राझीलमध्ये मागील २४ तासांमध्ये ३० हजारहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर कोरोना संसर्गामुळे एकाच दिवसात तब्बल एक हजार ४३७ जणांचा बळी गेल्याची माहिती ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यालयानेच गुरुवारी रात्री जाहीर केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. देशातील अनेक शहरांमधील दुकाने मंगळवारपासून सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर येथील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ब्राझीलमध्ये काल दिवसभरात एक हजार ४३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तेथील बळी गेलेल्यांची संख्या ३४ हजारहून अधिक झाली आहे. ब्राझीलने कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून ब्राझीलपेक्षा जास्त मृत्यू केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्ये झाले आहेत. तर सहा लाख १४ हजार ९४१ वर ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. ब्राझील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दुसऱ्या स्थानावर असून अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये चाचण्यांची संख्या खूप कमी असल्याने कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्राझीलमध्ये बुधवारी एक हजार ३४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर याच दिवशी ब्राझीलमध्ये २८ हजार ६३३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ब्राझीलबरोबरच लॅटीन अमेरिकेतील पेरु, इक्वाडोअर, पनामासारख्या देशांमध्येही कोरोनाग्रस्तांची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे.

दरम्यान लॉकडाउनच्या विरोधात ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे आहेत. बोल्सोनारो यांनी कोरोनासंदर्भात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोनाला अत्यंत सामान्य फ्लू म्हणत देशातील नागरिकांना अर्थव्यवस्था थांबता कामा नये असे आवाहन बोल्सोनारो यांनी केले होते. लोक तर मरणारच पण त्यासाठी देशाची अर्थव्यवस्था बंद केली जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

त्याचबरोबर मंगळवारपासून देशातील आर्थिक परिस्थिती बिघडून नये म्हणून अनेक शहरांमध्ये दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत रिओ द जानेरिओबरोबरच अनेक शहरांमधील दुकाने सुरु झाल्यापासून झपाट्याने वाढ होत असून कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी आणि अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये सरकारने अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment