मुंबईतील लोकल ट्रेन मोदी सरकारने सुरू कराव्यात, जितेंद्र आव्हाडांची मागणी


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नसल्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. काही प्रमाणात लोकल ट्रेन त्यांच्यासाठी सुरू कराव्या, अशी ही मागणी ट्विटरच्या माध्यमातून आव्हाड यांनी केली आहे.


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Leave a Comment