कोरोना; पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच, आरोग्यमंत्र्यांची घोषणा


मुंबई – राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. अत्यावश्यक सेवेत प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचादेखील समावेश करण्यात आला आहे. पत्रकार देखील कोरोना काळात माहिती मिळवण्यासाठी अपार मेहनत करत आहेत. तर दुसरीकडे काही पत्रकारांनाही आपले कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कोरोनाच्या संकटकाळात केवळ डॉक्टर आणि पोलीसच नव्हे तर पत्रकारही आपले कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवाने कर्तव्य बजावताना जर कोणी बाधित झाले तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालच. पण कर्तव्य बजावताना दुर्देवाने एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचे विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नसल्याचे टोपे म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जर लिहून दिले की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. तसेच दुर्देवाने यात त्याचा मृत्यू झाला, त्यालाच हे कवच मिळणार आहे. तसेच कोरोना विरोधातील लढ्यात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचे हे विमा कवच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकारांना विमा संरक्षण जाहीर केल्याबद्दल शिवसेना नेत्या डॉ. मनिषा कायंदे यांनीदेखील राजेश टोपे यांचे आभार मानले.

Leave a Comment