कोरोना वॉरियर : मुंबईमधील या पोलिसाने रुग्णांची मदत करण्यासाठी सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई सारख्या ठिकाणी सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. अशात येथे त्वरित रुग्णवाहिका मिळणे देखील अवघड जाते. यावर उपाय म्हणून कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत 34 वर्षीय कॉन्स्टेंबल तेजस सोनावणे यांनी खाजगी व्हॅनलाच रुग्णवाहिका बनवले आहे. सोनावणे यांनी मित्राच्या ओमनी व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करत मोफत प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सुरूवात केली आहे.

पीपीई किट खरेदी करणे शक्य नसल्यामुळे ते पारदर्शी रेनकोट, हातमोजे आणि फेस शिल्ड घालून ही रुग्णवाहिका चालवतात. मुळचे नंदुरबारचे असलेल्या सोनावणे यांनी मागील आठवड्यात ही सेवा सुरू केली असून, आतापर्यंत 6 जणांना मदत केली आहे.

Constable Tejas sonawane of Cuff parade police station purchased omni van and transferred into ambulance to serve the Corona patient Salute to him

Posted by Madhukar Kad on Sunday, May 31, 2020

दोन वृद्धांना रुग्णवाहिका मिळण्यास अडचण येत असल्याचे सोनावणे यांनी पाहिले होते. तेव्हाच त्यांच्या डोक्यात अशाप्रकारे मदतीची कल्पना आली. त्यांनी सांगितले की, रोडवर लोकांना रुग्णवाहिकेची वाट पाहताना आम्ही पाहिले. तेव्हाच काहीतरी करण्याचा निश्चय केला. मी मित्राला त्याच्याकडील ओमनी व्हॅन मागितली. यानंतर चालक आणि प्रवाशांच्या सीटमध्ये दुभाजक तयार केले व लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यास सुरूवात केली.

त्यांनी लोकांना मदतीसाठी आपला मोबाईल नंबर देखील दिला. जेणेकरून त्या भागातील लोक त्यांना मदतीसाठी फोन करतील. तेजस हे 2017 ला मुंबईला आले होते व आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह राहतात. ते म्हणाले की, संसर्ग होण्याची मला भिती नाही. दोन्ही मुलींना गावी पाठवले असून, जेथे नातेवाईक त्यांची काळजी घेतात. त्यांच्या या कामात वरिष्ठ अधिकारी देखील मदत करत असे, त्यांनी सांगितले.

Leave a Comment