पुण्यात दाखल झाला पहिला गुन्हा; लॉकडाऊनमध्ये घर भाड्यासाठी जबरदस्ती


पुणे – राज्य सरकारने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिने भाड्यासाठी तगादा लावू नये, असे आवाहन घरमालकांना केले होते. पण तरीही देखील काही घरमालक आपली मनमानी करत घरभाडे वसूल करत होते. असे प्रकार राज्यभर सुरु होते. आता पुण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीकडे घरभाडे मागणे घरमालकीणीच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरून शासकीय निर्देशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी घरमालकीणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर येथील ही विद्यार्थीनी आहे. घरभाडे मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असावी.

सध्या पुण्यात चंद्रपूरची रहिवाशी असलेली मेघा बोथरा ही विद्यार्थीनी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग या प्रकरणाविषयी माहिती देताना म्हणाले, मेघा चंद्रपूरची असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती पुण्यात आली आहे. पुण्यातील नवी पेठ भागात ती खोली भाड्याने घेऊन राहते. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घरमालिकीणीची माहिती काढली. घरमालकीणीचे नाव श्रेया लिमण असे असून घरभाड्यापोटी मेघा महिन्याला १७०० रुपये देते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने लॉकडाउन लागू केला. त्यामुळे तिच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे आले नाही. पोलिसांच्या माहितीप्रमाणे लिमण यांनी मेघाकडे घरभाड्याची मागणी केली. तसेच घरभाडे देणे शक्य नसेल, तर खोली रिकामी करण्यास सांगितले.

देशात २४ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर पुढील तीन महिने घरभाडे न मागण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. विद्यार्थीने तक्रार दाखल केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात सरकारने जारी केलेल्या निर्देशाप्रमाणे त्या घरमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंग म्हणाले.

Leave a Comment