बॉलिवूडमधील लोकप्रिय प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. 43 वर्षीय वाजिद यांनी मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अडीच-तीन महिन्यांपासून ते किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. वाजिद खान यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला असून अनेक सेलिब्रेटींनी आपण भावूक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत आहे वाजिद खानचा रुग्णालयातील शेवटचा व्हिडीओ
दरम्यान सध्या सोशल मीडियावर वाजिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाजिद खान रुग्णालयात बेडवर बसलेले या व्हिडीओत दिसत आहेत. हे गाणे आपण आपला भाऊ साजिदसाठी समर्पित करत असल्याचे ते सुरुवातीला सांगताना ऐकू येत आहे. वाजिद खान यावेळी सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटातील गाणे गातात. रुग्णालयातील इतर रुग्णदेखील त्यांचे हे गाणे ऐकून आनंद लुटत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पण दुर्दैवाने वाजिद खान यांचा रुग्णालयातील हा व्हिडीओ शेवटचा व्हिडीओ ठरला.
सलमान खान आणि काजोल यांच्या १९९८ मधील ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातून साजिद-वाजिद या जोडीने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी आपल्या करिअरमधील अनेक चित्रपट सलमानसोबतच केले. साजिद-वाजिद जोडीने ‘गर्व’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘पार्टनर’, ‘वीर’ आणि ‘दबंग’ या चित्रपटांना संगीतबद्द केले. अक्षय कुमारच्या रावडी राठोड चित्रपटालाही वाजिद यांनी संगीत दिले होते. यामधील त्यांनी ‘चिंता ता ता चिंता’ हे गाणे गायले होते. त्याचबरोबर साजिद-वाजिद जोडी ‘सारेगमपा” या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. तसेच त्यांनीच आयपीएल ४ चे थीम साँगही तयार केले होते.