सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहचला भारत


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच आपल्या विळख्यात घेतले असून जगभरातील 213 देश या भयाण महामारीचा सामना करत आहेत. दरम्यान सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या टॉप-10 यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. त्याचबरोबर फ्रान्सला देखील भारताने मागे टाकले आहे.

कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण फ्रान्समध्ये असून फ्रान्सला मागे टाकत नवव्या क्रमांकावरुन भारताने सातव्या क्रमांकावर उडी मारली आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर अद्याप कायम असून कोरोनाचे १८ लाख रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यानंतर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. कोरोनाचे पाच लाख ब्राझीलमध्ये तर चार लाख रुग्ण रशियात आहेत.

कोरोनाच्या ८३८० नव्या रुग्णांची रविवारी देशात नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. पहिल्यांदाच आठ हजाराचा आकडा एका दिवसात पार झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून १९३ रुग्णांचा गेल्या चोवीस तासांमध्ये मृत्यू झाला. एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४,१६४ रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. ८९,९९५ रुग्णांवर देशभरात उपचार केले जात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

Leave a Comment