ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेत अनिवार्य


मुंबई – राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यापूढे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत आता मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

मराठी हा विषय राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


यावर्षी मराठी हा विषय इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, 2021-22 या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, 2022-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर 2023-24 या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment