चीनची भारताला धमकी; आर्थिक परिणाम भोगायचे नसतील तर दूर रहा


नवी दिल्ली – चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांचे शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा भारताला होत असून अमेरिकेशी असलेले भारताचे संबंध अजूनही घट्ट होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे चीनने अमेरिका आणि आमच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धापासून भारताने दूर रहावे असा इशाराच दिला आहे. भारताला अशा प्रकारचा सल्ला देत सांगण्यात आले आहे की, अमेरिका आणि चीनमधील वादात भारत दूर राहिला तर बरे होईल, असे वृत्त चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आले आहे.

यावेळी अमेरिकेचा सहकारी होऊन भारताने जर चीनविरोधात काहाही कारवाई केली तर कोरोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील, असे चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी देत म्हटले आहे. अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धापासून भारताने दूर राहावे जेणेकरुन दोन्ही देशांमधील व्यावहारिक संबंध पुढेही सुरु राहतील, असे चीनने म्हटले आहे. भारतासोबतचे व्यावहारिक संबंध चांगले ठेवणे हे आपले लक्ष्य असल्याचेही चीनने सांगितले आहे. यामुळे यापुढेदेखील भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी चीन दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक असल्याचेही चीनने सांगितले आहे.

यावेळी भारताला इशारा देताना चीनने म्हटले आहे की, भारताला कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत यासाठी चीन प्रयत्न करत असल्यामुळे भारत-चीन संबंधांबद्दल सकारात्मक विचार करत मोदी सरकारने पुढील वाटचाल केली पाहिजे. भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर चीनने कोरोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे.

Leave a Comment