एफडीए देणार पीपीई किट उपलब्ध असलेल्या औषध दुकानांची माहिती


मुंबई : कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले असून पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जाहीर केली आहे.


पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (ड्रग्ज) हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पीपीई किटचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विक्रेते व किट निर्मात्यांशी संपर्क साधण्याचे काम हे सहायक आयुक्त करणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. पीपीई किट वितरणामध्ये आणखी औषध दुकानदारांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त (ड्रग्ज) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

Leave a Comment