आज संध्याकाळपर्यंत जाहिर होणार राज्यातील नियमावली, पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा


मुंबई – राज्यातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आज संपुष्टात येणार असून देशात उद्यापासून पाचव्या टप्प्यातील लॉकडाउनला सुरूवात होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी नियम आणि अटी जारी केल्या आहेत. लॉकडाउन कसा असावा याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला अनेक अधिकार दिले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन जारी केल्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. यामुळे ही बैठक राज्यातील राजकीय स्थितीबाबत होती की लॉकडाउनसंदर्भात यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. टप्पाटप्प्याने राज्यातील लॉकडाउनमध्ये सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीत राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध अधिक शिथिल करण्याबाबत मतभेद कायम असल्याचेही काही माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्तीत जास्त सवलती देण्याची मागणी केली जात असली तरी कठोर निर्बंध कायम ठेवण्यावर मुख्यमंत्री ठाम असल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात या संदर्भात शनिवारी रात्री चर्चा झाली. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दुकाने काही काळ उघडण्यास परवानगी द्यावी, तसेच उद्योगधंदे सुरू व्हावेत, अशी पवारांची भूमिका आहे. तर टप्प्याटप्प्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी पवारांची मागणी असल्याचे समजते.

कोरोनाबाधितांची राज्यातील संख्या दिवसागणिक वाढतच आहेत. कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमध्ये वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउनमधून कोणत्या गोष्टींना सूट मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून नवे दिशानिर्देश जारी केले जातील, असे प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment