गृहमंत्र्यांचा शेतकऱ्यांना टोळधाड रोखण्यासाठी फटाके फोडणे, ढोल वाजवण्याचा सल्ला


नागपूर – भारतावर कोरोना व्हायरससह टोळधाडीचे संकटही ओढावले आहे. टोळीच्या झुंडी उत्तर भारतात पिकांचे नुकसान केल्यानंतर आता महाराष्ट्रात दाखल झाल्या. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या काटोल मतदारसंघात टोळीधाडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना टोळधाडीपासून संरक्षण म्हणून फटाके फोडा, ढोल वाजवा असा सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांनी टोळधाडी बाबत सतर्क राहावे. फटाके फोडून, ढोल वाजवून टोळधाड टाळता येऊ शकते. तसेच जळलेल्या टायरच्या धुराने देखील टोळीच्या धुंडी परतवून लावता येतात, असे शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी सांगितले.

यापूर्वी 50% टोळ झुंडी राज्याच्या कृषी विभागाने नष्ट केल्याची माहिती महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली होती. किटकनाशक फवारण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वापर करण्यात आला असून शेतकऱ्यांना किटकनाशके मोफत दिल्याचेही भुसे यांनी सांगितले होते. पाकिस्तानातून टोळझुंडी या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यात दाखल झाल्या. त्या ठिकाणी टोळीधाडीने पिकांचे मोठे नुकसान केल्यानंतर टोळीच्या झुंडीने महाराष्ट्रातील पिकांवर आक्रमण केले. दरम्यान सतर्क राहून टोळीधाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास महाराष्ट्राच्या कृषी विभागाला यश आले आहे.

Leave a Comment