आमदार रवी राणांविरुद्ध संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल


अमरावती : राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचारबंदी लागू असताना अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी बेकायदेशीररित्या आमदार रवी राणा यांनी उड्डानपुलाचे उद्घाटन केले होते. आमदार रवी राणा यांनी त्यासाठी ऑटो रिक्षा आणि 15 ते 20 कार्यकर्ते जमवले होते. या प्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, 269 नुसार संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटो रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment