यंदा अमरनाथ यात्रा १५ दिवसांचीच

फोटो साभार जागरण जोश

करोना उद्रेक आणि त्यामुळे देशभर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे यंदा वार्षिक अमरनाथ यात्रा कालावधी कमी करून १५ दिवसांचा होण्याची शक्यता असून या काळात अगदी मोजक्या यात्रेकरूना यात्रा परवानगी दिली जाईल असे समजते. या संदर्भातला अंतिम निर्णय पुढच्या आठवड्यात होत असलेल्या अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

यंदा अमरनाथ यात्रा २३ जून रोजी सुरु होत असून ३ ऑगस्ट पर्यंत होती. मात्र कोविड १९ मुळे  यात्रेकरूंची नोंदणी दरवर्षी १ एप्रिल पासून सुरु होते ती यंदा अजून सुरु झालेली नाही. यात्रा मार्ग बर्फ हटवून मोकळा करण्याचे काम अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे यात्रा २३ जून ला सुरु होणे अवघड बनले आहे. परिणामी १५ जुलै पासून यात्रा सुरु करून पुढे १५ दिवस सुरु ठेवावी असा विचार सुरु आहे.

यंदा फक्त बालताल मार्गे यात्रा सुरु राहील आणि यात्रेकरूंची संख्याही मर्यादित ठेवली जाईल असे सांगितले जात आहे. फक्त छडी मुबारक परंपरेनुसार पहलगाम वरून जाईल. या कार्यक्रमात काही अडचण आल्यास छडी मुबारक द्शनामी आखाडा महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली हेलीकॉप्टरने अमरनाथ गुहेपर्यंत नेली जाईल असेही सांगितले जात आहे.

अमरनाथ गुहा समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर म्हणजे ११ ते १२ हजार फुट उंचीवर असून या गुहेत दर वर्षी बर्फाचे नैसर्गिक भव्य शिवलिंग तयार होते. हे स्थान बर्फानी बाबा म्हणूनही ओळखले जाते आणि दरवर्षी लाखो भाविक ही यात्रा करतात.

Leave a Comment