अकोला लॉकडाऊनवरुन काही तासातच पालकमंत्री बच्चू कडूंचे घूमजाव


अकोला : देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. अशात अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 ते 6 जूनदरम्यान अकोला शहरात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण त्यांनी आपल्या घोषणेचे सहा तासांतच चक्क ‘यू-टर्न’ घेतला आहे. आता राज्य सरकारच्या परवानगीनंतर अकोल्याचे जिल्हाधिकारी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी सरकारशी कोणतीही चर्चा न करता घोषित केलेल्या अकोल्यातील ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला होता.

राज्य सरकारने यापूर्वीच स्थानिक स्तरावर स्वतंत्र आदेश काढता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याकडे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दुर्लक्ष करून थेट लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या भूमिकेत घुमजाव करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. आमचा 1 ते 6 जूनपर्यंत जनता कर्फ्यू करण्याचा मानस आहे. यासाठी आम्ही राज्य सरकारची परवानगी घेऊ. परवानगी आल्यानंतर जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी घोषणा करतील, असे कडू यांनी म्हटले आहे.

विदर्भातील अकोला हे कोरोनाचे सर्वात मोठे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. अकोल्यात गुरूवारी रात्रीपर्यंत कोरोनाचे 516 रूग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 28 लोकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अकोलेकर कोरोनाच्या भयाने सैरभैर झाले आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या ‘बैठक-बैठक’ खेळात अकोला विदर्भातील कोरोनाचे सर्वात मोठे ‘हॉटस्पॉट’ ठरले. एरव्ही अकोल्यात फक्त बैठकांपुरतेच मर्यादीत पालकमंत्री बच्चू कडू एकदम जागे झाले आहेत. त्यांनी गुरूवारच्या सर्वपक्षीय बैठकीत अकोल्यात 1 ते 6 जूनदरम्यान शहरात संपूर्ण ‘लॉकडाउन’चा निर्णय जाहीर केला.

तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी निर्णय तर घेतला खरा. मात्र, हे करतांना राज्य सरकार आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी त्यांनी यासंदर्भात चर्चाच केली नसावी. कदाचित त्यामुळेच त्यांना ‘यू-टर्न’ घ्यावा लागला असावा. अन् मग त्यांचे पुढचे वक्तव्य ‘विचारू-पाहू-करू’ या प्रकाराचे होते.

Leave a Comment