पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी उडवला ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा


पुणे : शुक्रवारी सकाळी औंध-रावेत उड्डाणपूलाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पण या कार्यक्रमात कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला. विशेष म्हणजे यावेळी सोशल डिस्टसिंगचा फज्जाही उडाला. सोशल डिस्टसिंगचे कुठलेही भान यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रकोप कायम असताना देखील असे कार्यक्रम होत असतील तर जिल्ह्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात सध्या कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून चौथा लॉकडाऊन सुरु आहे. असे करून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवण्याची तयारी केली आहे. त्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टसिंगचा अशा प्रकारे फज्जा उडत असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावे? त्याचबरोबर केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच जमावबंदी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम आहेत का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार घेईल, असे सांगितले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने जाहीर केलेले 21 लाख कोटी कोणाला भेटणार, या बाबत अनेक मतप्रवाह असल्याचेही त्यांनी सांगितले. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. दरम्यान अजित पवार यांनी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे लाखो परप्रांतीय मजूर आपल्या घरी परतले आहेत. आता त्यांची पुन्हा वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असे अजित पवार यांनी म्हटले. लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही पवार यावेळी म्हणाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. ‘कोरोना’ विरोधात संपूर्ण राज्य लढाई लढत आहे. जनतेचाही मोठा पाठींबा या लढाईला मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *