सरकारी समित्यांची ३१ मे नंतर लॉकडाऊन न वाढवण्याची शिफारस


नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारला सरकारी समित्यांनी ३१ मे नंतर केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता देशातील अन्य भागांमध्ये ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका, अशी शिफारस केली आहे. सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही समित्यांची आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि क्वारंटाईन सुविधा या गोष्टींच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आली होती.

देशातील लॉकडाऊन कशाप्रकारे उठवायचा, याचा सविस्तर एक्झिट प्लॅन यापैकी दोन समित्यांनी मोदी सरकारपुढे मांडल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता इतर भागांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरु करावेत, असे यामध्ये म्हटले आहे. पण, या समित्यांनी शाळा, महाविद्यालये आणि सिनेमागृह सुरु करण्यास नकार दर्शविला आहे. तसेच तुर्तास आंतरराष्ट्रीय विमानप्रवासही बंद ठेवावा, असेही या समितीचे म्हणणे आहे. पण, या गोष्टी वगळता लोकांवरील इतर निर्बंध उठवण्यात यावेत, असा प्रस्ताव या समित्यांनी मांडला आहे.

तसेच अत्यंत आक्रमकपणे चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात करावे. येथील नियम आणखी कडक करण्यात यावेत, असेही समित्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित असतील. त्याठिकाणी लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment