देशांतर्गत सुरु झालेली विमानसेवा वादात! ७ विमानांमध्ये आढळले १७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण


नवी दिल्ली – २५ मे पासून देशांतर्गत एक तृतीयांश भागात विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. पण तत्पूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विविध हवाई कंपन्यांनी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनाच्या विरोधात त्यांनी सर्व खबरदारी आणि सुरक्षा व्यवस्था केल्याचा दावा केला होता.

पण आता त्यांचा दावा फोल ठरतो आहे की काय असे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण विमान प्रवास सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून या विमानांमध्ये कोरोनाबाधित आढळून येत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ७ विमानांमध्ये आतापर्यंत १७ कोरोनाबाधित आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.

मागील तीन दिवसांत इंडिगोच्या चार उड्डाणांमध्ये १२ कोरोनाबाधित प्रवासी आढळले असून स्पाइस जेटच्या एकाच उड्डाणात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर अलायन्स एअरमध्ये देखील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय एअर इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे.

देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दरम्यान बस, रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही २५ मेपासून सुरू झाली आहे. साधारण दोन महिन्यांपासून विमान सेवा स्थगित झाल्यानंतर देशांतर्गत विमानांचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. यावेळी प्रवाशांमध्ये उत्साह असला तरी त्यांना कोरोनाची भीती देखील आहे.

Leave a Comment