जेजुरीच्या खंडेरायाची द्राक्ष पूजा, करोना रुग्णांना देणार प्रसाद

फोटो साभार  भास्कर

करोना मुळे देशभरातील सर्व मंदिरे लॉक डाऊन काळात बंद असली तरी नित्याची पूजा मंदिरातून होते आहे. महाराष्ट्राचे दैवत जेजुरीच्या खंडेरायाची २८ मे रोजी विशेष पूजा केली गेली. त्यावेळी खंडेरायाचे गर्भगृह द्राक्षे आणि द्राक्षवेलींनी सजविले गेले होते. तसेच १०१ क्विंटल द्राक्षे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केली गेली. ही द्राक्षे करोना संक्रमित, हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना, रिलीफ कॅम्प मधील लोकांना प्रसाद म्हणून वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे असे समजते.

लॉकडाऊन मुळे जेजुरी गडावरचे खंडोबा मंदिर दोन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र नित्याची पूजा केली जात आहे. पंढरपूर येथील शेतकरी कृष्णकांत देशमुख यांनी त्याच्या बागेतील द्राक्षे खंडोबाला अर्पण करण्यासाठी पाठविली होती. लॉकडाऊन मुळे ते स्वतः मंदिरात जाऊ शकले नाहीत.

फोटो साभार नेटिव्ह प्लेस

जेजुरी गडावरचे खंडोबा मंदिर जगभरत प्रसिद्ध असून दरवर्षी दसऱ्याला येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर भंडारा म्हणजे हळद उधळली जाते आणि जेजुरी गड सोन्यासारखा पिवळा होतो. दसऱ्याला ४२ किलो वजनाची तलवार उंच उचलण्याची स्पर्धा होते. ही तलवार दातात धरून उचलायची असते. खंडोबा हा शिवाचा अवतार मानला जातो. पृथ्वीवर जेव्हा मल्ल आणि मणी राक्षसांनी अत्याचार सुरु केले तेव्हा शिवाने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन त्यांचा नाश केला अशी कथा सांगतात.

Leave a Comment