मनसेच्या या नेत्याने दादरमध्ये सुरु केला भाजीविक्रीचा धंदा


मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबुकवरून शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते मराठी तरुणांना रस्त्यावर उतरुन व्यवसाय करायला लाजू नका, असे आवाहन करताना या व्हिडिओत दिसत आहेत. दादरमध्ये रस्त्यावर भाजीचा स्टॉल मनसेचे स्थानिक उपाध्यक्ष नंदू बागलकर यांनी सुरु केला आहे. संदीप देशपांडे यांनी या स्टॉलवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर स्टॉलवर काहीवेळ उभे राहून त्यांनी स्वत:ही भाजीविक्री केली. त्यांनी हा व्हिडिओ यावेळी शुट केला आहे. त्यामुळे मराठी तरुण आता या आवाहनाला कितपत प्रतिसाद देणार, हे आगामी काळातच कळेल.

महाराष्ट्राच्या शहरी भागातील परप्रांतीय लोक आणि कामगार कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कारखान्यांमध्ये आणि इतर दैनंदिन व्यवसायासाठी आता लॉकडाऊननंतर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भूमिपुत्रांना ही संधी सोडू नका, असे आवाहन केले होते. मनुष्यबळाचा तुटवडा महाराष्ट्रातील कारखानदारांना भासता कामा नये. त्यासाठी घराबाहेर पडून नोकरी-धंदा करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

तर दुसरीकडे नजीकच्या काळात राज्यात कामगारांची समस्या निर्माण होईल, असा अंदाज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माणसांचा तुटवडा अनस्किल्ड कामांसाठी जाणवणार नाही. त्यासाठी कारखानदार कोणालाही कामावर ठेवू शकतील. पण, मनुष्यबळाचा तुटवडा हिरे व्यवसायासारख्या विशेष कौशल्याची गरज असलेल्या क्षेत्रात जाणवू शकतो. मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रातून बंगाली कारगिरांनी स्थलांतर केल्यामुळे महाराष्ट्रापुढे नजीकच्या काळात पेच उभा राहू शकतो, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भातील वृत्त झी 24 तासने दिले आहे.

Leave a Comment