सलून, ब्युटी पार्लर सुरु होणार असल्याची अफवा


मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. त्याला सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर देखील अपवाद नाहीत. त्यातच मागील दोन-अडीच महिने सलून बंद असल्यामुळे काहीजणांनी तर आपल्या घरीच आपली केशरचना केली आहे. तरी देखील सलून आणि ब्युटीपार्लर कधी सुरु होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. त्याच दरम्यान काल दिवसभर सोशल मीडियात सलून आणि ब्युटीपार्लस सुरु होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. तो मेसेज आपल्यापैकी अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी अनेकांना फॉरवर्ड देखील केली. पण अद्याप अनेकजण असे आहेत ज्यांना याची माहिती नाही. यापैकी कोणाला असा मेसेज आला असेल तर तो वेळीच डिलीट करा, कारण असा कोणताही शासन आदेश काढण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण खुद्द सरकारकडूनच देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा मेसेज निव्वळ अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.

29 मेपासून सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि तत्सम सुविधा सुरु होणार नाहीत. राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमात कुठलेही बदल केलेले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचना या फेक आहेत. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे राज्य सरकारने ट्विटरवरुन स्पष्ट केले आहे.


बगिचे, मैदाने, फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि इतर शारिरीक व्यायाम करण्यास पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. सायकलिंग करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, अशा प्रकारच्या फेक अधिसूचना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्याचबरोबर शुक्रवार 29 मेपासून राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचाही खोटा मेसेज अधिसूचनेच्या स्वरुपात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण सोशल मीडियावरील या अधिसूचना फेक आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment