टी सीरिजच्या हनुमान चालिसाचा विक्रम; एक अब्ज वेळा पाहिला गेला हा व्हिडीओ


टी सीरिजचे भूषण कुमार हे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतात. पण ते यावेळी चक्क ‘हनुमान चालिसा’मुळे चर्चेत आहेत. टी सीरिजच्या ‘हनुमान चालिसा’या व्हिडीओला विक्रमी व्हूज मिळाले असून भारतात असा विक्रम करणार हा पहिलाच व्हिडीओ ठरला आहे. युट्यूबवरील टी सीरिज हे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक असून या चॅनेलवर ९ मे २०११ साली ‘हनुमान चालिसा’चा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ गेल्या नऊ वर्षात तब्बल एक अब्ज वेळा पाहिला गेला आहे.

याबद्दलची माहिती भूषण कुमार यांनी ट्विट करुन चाहत्यांना दिली. भुषण कुमार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ही टी सीरिजच्या कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी आहे. एक अब्ज व्हूज आपल्या हनुमान चालिसाच्या व्हिडीओला मिळाले असून तुम्ही असाच आशिर्वाद आम्हाला देत राहा जेणेकरुन आणखी मोठे विक्रम आम्ही प्रस्थापित करत राहू. सध्या सोशल मीडियावर भूषण कुमार यांचे हे ट्विट चर्चेत आहे. यावर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. टी सीरिजला या नव्या विक्रमासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment