नवी दिल्ली – श्रमिक ट्रेनवरुन महाराष्ट्र आणि आणि रेल्वे मंत्रालयात ट्विटर वॉर रंगले असतानाच आता रेल्वेमंत्रालयावर केरळ सरकारने गंभीर आरोप केले आहेत. केरळ सरकारने विशेष श्रमिक ट्रेन हाताळण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला असून राज्य सरकारला श्रमिक ट्रेनची कोणतीही पूर्वमाहिती न देता या ट्रेन पाठवल्या जात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आखलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलाव होत असतानाच या व्हायरसचा बिमोड करण्यात केरळ सरकारने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. त्यामुळे केरळ सरकारची परकीय प्रसारमाध्यमांनीही दखल घेत कौतुक केले आहे.
रेल्वेच्या माध्यमातून केंद्र कोरोना वाढीस घालत आहे खतपाणी; केरळ सरकारचा गंभीर आरोप
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबधी पत्र लिहिले आहे. तर रेल्वे केरळमध्ये कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री थॉमस यांनी केला आहे. सध्या केरळमध्ये कोरोनाचे ८९६ कोरोना रुग्ण आहेत. यामधील २०० रुग्ण हे लॉकडाउनदरम्यान राज्यातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून परतलेले ७२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले असून ७१ जण तामिळनाडू तर ३५ जण कर्नाटकहून परतलेले आहेत.
याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, परराज्यात अडकलेले आमच्या राज्यातील लोक आपल्या घरी परतत आहेत त्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. पण आमच्या सरकारला याबाबतची कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे आमच्या कोरोनाविरोधातील लढाईत अडचणी निर्माण होत आहेत. केरळला कोणताही माहिती न देता मुंबईहून ट्रेन पोहोचली होती. यामुळे आमची कोरोनाबाधिताची ओळख पटवण्यासाठी आखलेली यंत्रणा बिघडत आहे. हा मुद्दा रेल्वे मंत्र्यांकडे देखील मी उपस्थित केला. पण यानंतरही अजून कोणताही पूर्वकल्पना न देता एक ट्रेन केरळमध्ये पोहोचली. हा मुद्दा पंतप्रधानांकडेही मी मांडल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.
A train came from Mumbai last week. We were intimated only after train started . Unscheduled stops. Majority of passengers no passes. Anarchy in pandemic times.Railways want to be super spreader in Kerala. Stop ranting and behave responsibly. At least try to track your trains.
— Thomas Isaac (@drthomasisaac) May 26, 2020
दरम्यान याबाबत अर्थमंत्री थॉमस यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात मुंबईहून एक ट्रेन आली आणि ट्रेन सुरु झाल्यानंतर याची माहिती आम्हाला देण्यात आली. अनेक स्थानकांवर थांबलेल्या या ट्रेनमधील प्रवाशांकडे पास नव्हते. महामारीत हा भोंगळ कारभार सुरु आहे. रेल्वेला केरळमध्ये कोरोनाचा फैलाव करायचा आहे. जबाबदारीने वागा, किमान तुमच्या ट्रेनच्या माहिती तरी ठेवा, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
रेल्वेने केरळमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाइन केले जात असून आमच्याकडे आधीपासूनच यादी असली तर आम्ही वैद्यकीय तपासणी आणि होम क्वारंटाइनसाठी योग्य व्यवस्था करु शकतो, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.