हावर्डच्या तज्ज्ञांना राहुल गांधींचा प्रश्न; भैया, ये बताइए वैक्सीन कब आएगी?


नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी जगातील दोन मोठ्या तज्ज्ञांशी कोरोना संदर्भात संवाद साधला. यावेळी कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे होणारी हानी यावरही चर्चा केली. या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी हावर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांना भैया, ये बताइए वैक्सीन कब आएगी? असा एक प्रश्न विचारला.

त्यावर झा यांनी उत्तर देताना असे म्हटले की, तीन देशांपासून अशी अपेक्षा आहे की त्यांच्याकडून प्रतिबंधक लस लवकरच येईल, परंतु ही लस पुढील वर्षात उपलब्ध होईल अशी पूर्ण आशा आहे. यासाठी भारताला नियोजन करावे लागेल, कारण भारताला 50 कोटींपेक्षा जास्त प्रतिबंधक लस बनवाव्या लागतील.


विशेष म्हणजे अमेरिका, युनायटेड किंगडम आणि इस्त्राईलसारख्या देशांमध्ये यावर सध्या काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातही त्याची चाचणी सुरू झाली आहे, ज्यामध्ये अशी अपेक्षा आहे की या वर्षाच्या अखेरीस ही लस येऊ शकेल. तथापि, बर्‍याच तज्ञांचे म्हणणे आहे की ही लस पुढच्या वर्षीपर्यंतच उपलब्ध होईल. कारण यशस्वी चाचणी व पूर्ण प्रक्रियेनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात लस बनविणे फार कठीण जाईल.

दुसरीकडे, भारतातील अनेक संशोधक लस बनवण्यावरही काम करत आहेत, त्यांना भारत सरकारची मदतही मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस भारतात प्रथम तयार झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

तज्ज्ञांशी चर्चेदरम्यान राहुल गांधींनी कोरोनाचे परिणाम, लॉकडाऊनमुळे लोक बेरोजगार होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की कोरोनानंतर जग पूर्णपणे बदलेल, परंतु लोकांना एकत्र आणण्याचे कामही करेल. कारण आज प्रत्येकजण जाती-धर्म विसरून कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना एकाच धोरणावर काम करावे लागेल. कारण कोरोनाची खरी लढाई जमिनीवर लढली जात आहे.

Leave a Comment