मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली याची तपशीलवार माहिती दिली. त्याला उत्तर देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत शिवसेनेकडून अनिल परब, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपस्थित होते. दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना भारतीय जनता पक्ष हा खरच महाराष्ट्राचा हितचिंतक आहे का? असे प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. तसेच राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील अशी आशा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे, पण ती तथ्यहिन असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसे झाले तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही कधीच उतरणार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्ष खरोखरच महाराष्ट्राचा हितचिंतक आहे का?
कोरोनासारख्या संकटकाळात ठाकरे सरकार खूप योग्य आणि पद्धतशीर काम करत आहे. देशात सध्याच्या घडीला सर्वाधिक चाचण्या या एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयेही उभी करण्यात आली आहेत. गुजरातची अवस्था किती बिकट आहे ते जरा बघा. मला स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही, पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधील स्थिती अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यही महाराष्ट्राचे अनुकरण करू लागली आहेत. फडणवीस यांनी अशा काळात राजकारण करु नये. उलट या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी अजूनही वेळ गेली नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री निधीतून मजुरांना घरी जाण्यासाठी पैसे देण्यात आले. ज्या ज्या सुविधा आम्ही मागितल्या त्या आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळाल्या नसल्याची खंतही जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली. मुंबईसह राज्यातील इतर शहरातून मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी या मुद्यावरून राज्यातील भूमीपुत्रांकडे ती कौशल्य नसल्याचे वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या वक्तव्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
फडणवीस यांनी मंगळवारी भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांची काम करणे शक्य होणार नाही. भूमिपुत्रांना संधी मिळाली, तर आनंदच आहे, पण राज्य सरकार त्यांच्यामध्ये असे कौशल्य दोन महिन्यांत विकसित करू शकणार नसल्याचे म्हटले होते. जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या विधानावरून पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्व मजूर राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. त्या लोकांकडे असलेले कौशल्य महाराष्ट्रातील लोकांकडे नाही. महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचे काम फडणवीस यांनी केले.
राज्याच्या तरुणांमध्ये, जनतेमध्ये स्किल आहे. ही कारखानदारी ते पूर्ण ताकदीने चालू करू शकतात, असा विश्वास आहे. जे गेले आहेत, ते परत येतील. पण, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कारखानदारी सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्कील आहे. नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणारे विधान फडणवीस यांचे आहे. स्किल इंडियाने मागच्या पाच वर्षात काही स्किल दिली असतील, त्याचाही वापर झाला पाहिजे. पण, त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नसल्याचे म्हणत पाटील यांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला.