देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 45 हजारांच्या पार


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून आज देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 45 हजार 380 पार पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 6535 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, मागील चार दिवसांपासून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर नव्या रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचे आढळून आले. तसेच 146 लोकांचा मागील 24 तासांमध्ये मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 4167 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हजार 491 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

20 ते 25 मे दरम्यान देशात दररोज सरासरी 6200 रुग्ण समोर येत आहेत. कोरोना बाधितांची संख्या जर अशीच वाढत राहिली तर 26 मे ते 1 जुलै दरम्यान, 36 दिवसांत जवळपास 2 लाख 23 हजार 200 नवे कोरोना बाधित रुग्ण समोर येऊ शकतात. जर ही संख्या 25 मेपर्यंतच्या कोरोना बाधितांच्या संख्येशी जोडली तर, 1 जुलैपर्यंत एकूण कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 62 हजार 45 वर पोहोचू शकते.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून काल महाराष्ट्रात 1 हजार 186 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 हजार 667 झाला आहे. त्यातील 15 हजार 786 बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 35 हजार 178 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचा आकडा 1695 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.97 टक्के आहे. मुंबईत 31 हजार 972 कोरोनाबाधित असून 026 बळी गेले आहेत.

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये जगभरातील 213 देशांमध्ये 90,128 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत 3,096 ने वाढ झाली आहे. तर एक दिवस अगोदर 2,826 लोकांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात 55 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 लाख 47 हजार 613 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 लाख 61 हजार 092 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 74 टक्के कोरोना बाधित फक्त 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 41 लाखांवर पोहोचली आहे.

Leave a Comment