मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असतानाचा दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. राज्याचे वातावरण विरोधकांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीमुळे ढवळून निघाले आहे. ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त बैठक झाली. पण, अशी बैठक झालीच नाही, असा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
राणेंचा गौप्यस्फोट ! शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक झालीच नाही
सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ‘मातोश्री’वर गेलेच नसल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही. हे सरकार कोरोनाला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे राज्यात राष्ट्रपती लावली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली.
त्याचबरोबर आपल्या मंत्रिपदाची चिंता काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना असल्यामुळे ते सरकार टिकेल असे म्हणत असल्याचा टोलाही राणेंनी लगावला. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि महापालिकेच्या तावडीतील सर्व रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती.