जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, या महामारीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मनुष्य जातीवर या महामारीचे संकट असताना आता शेती, बागायतीमध्ये देखील एक नवीन आजाराने शिरकाव केला आहे. ‘फ्युसॅरियम विल्ट टीआर4’ या नवीन बुरशीने जगभरातील केळीच्या बागांना उद्धवस्त केले आहे. आता ही बुरशी भारतात हॉटस्पॉट निर्माण करत आहे. ट्रॉपिकल रेस 4 (टीआर 4) सर्वात प्रथम तायवानमध्ये आढळला होता. त्यानंतर आशिया, मध्य पुर्व, आफ्रिकेनंतर हा शेतीचा आजार लॅटिन अमेरिकेत पोहचला आहे. ही बुरशी पानांवर हल्ला करते. यामुळे पाने पिवळी होतात. अद्याप यावर कोणताही उपाय सापडलेला नाही.
आता झाडांमध्ये देखील पसरला हा भयानक ‘बनाना कोव्हिड’ रोग

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर बनानाचे डायरेक्टर एस. उमा म्हणाले की, हा वनस्पती जगतातील कोव्हिड-19 आहे असेही म्हणू शकतो. याचे हॉट स्पॉट बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले असून, यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषि संघटनेनुसार टीआर4 हा वनस्पतीमधील सर्वात धोकादायक आजार आहे. वनस्पतीमध्ये हा आजार पसरू नये म्हणून ‘प्लँट क्वारंटाईन’ देखील वैज्ञानिकांनी सुचवले आहे. या धोकादायक बुरशीमुळे जगभरातील 26 बिलियन डॉलर्सचा केळी व्यवसाय धोक्यात आला आहे.

भारतात वर्षाला 27 मिलियन टन केळीचे उत्पादन होते व 100 पेक्षा अधिक प्रकार आहेत. टीआर 4 हा भारतात कसा पसरला याची माहिती अद्याप वैज्ञानिकांना मिळालेली नाही. 9 महिन्यांपुर्वी हा आजार भारतात आल्याचे सांगितले जाते.