राष्ट्रपती राजवटीवरुन नारायण राणेंनी भाजप नेत्यांनाच सुनावले


मुंबई – एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी ही आपली वैयक्तिक असून पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण तत्पूर्वी सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू कऱण्याची परिस्थिती नसल्याचे भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांना याविषयी विचारले असता, याबाबत भाजप नेत्यांना आपण विचारायला गेलो नसल्याचे म्हटले आहे.

मी सुधीर मुनगुंटीवार यांना विचारत नाही आणि मला कोणी सांगावे असेही नाही. राज्यातील लोकांना वाचवण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. मी केंद्र सरकार आणि राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या जनतेला वाचवा अशी मागणी केली आहे. भाजपच्या कोणत्याच नेत्यांना मी विचारायला गेलेलो नाही. ते वरिष्ठ असतील, पण मीदेखील माजी मुख्यमंत्री आहे आणि मी काय काल राजकारणात आलेलो नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये आधी राष्ट्रपती राजवट लावा असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना, केंद्र सरकारने कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्यासाठी संजय राऊत यांना सल्लागार म्हणून ठेवले आहे का?, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

बेताल संजय राऊत बोलत असतात. आपली शिवसेनेत तरी औकात आहे का हे संजय राऊत यांनी आधी तपासावे आणि त्याचे आत्मपरीक्षण करावे. महाराष्ट्रातील अपयशावर संजय राऊत यांनी बोलावे. मुंबईत हजारो रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत त्याचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले आहेत. कोरोनाचा सामना कऱण्यात निष्काळजीपणा कुठे सुरु आहे. उपाययोजना करण्यात कोणते सरकार कमी पडले याचा रिपोर्ट राज्यपाल केंद्र सरकारला पाठवत असतात. त्यामुळे त्यांना सगळी माहिती असते, असे यावेळी त्यांनी सांगितले.

हे लोक राष्ट्रपती राजवटीला एवढे घाबरले की त्यांनी लगेच बैठका घेतल्या आणि सकाळी पत्रकार परिषद बोलावली असा टोला यावेळी त्यांनी लगावला. रुग्णाला वाचवू, कोणालाही मरु देणार नाही अशी बोलण्याची धमक एकाही नेत्यात नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. केंद्राकडे मागणी करताना स्वत: काही देत नाही. कोणत्याही रुग्णालयात पुरेशी सामग्री उपलब्ध नाही असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

सरकार स्थिर असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे असे विचारले, असता नारायण राणे यांनी सांगितले की, मी शरद पवारांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रात स्थिर सरकार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पण जमत नाही. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकार स्थिर आहे का अस्थिर आहे. सरकार राहणार की जाणार हे लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. त्याचबरोबर राणे यांना ऑपरेशन लोटस राबवले जात आहे का असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार देत हे सरकार आपोआपच जाणार, सरकार आपण चालवू शकत नाही हे त्यांनाही माहिती असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment