महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभी


नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देशातील परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी यावेळी राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरही त्यांनी भाष्य केले. विशेषतः कोरोनाच्या प्रसाराच्या मुंबईतील कारणांचा उलगडा करतानाच राज्यातील सत्तेत असलो, तरी महत्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारच घेऊ शकतात. पण महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत करायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी देशातील कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, आपण २१ दिवसात कोरोना व्हायरसचा पराभव करू. पण, आता ६० दिवस झाले आहेत आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आता लॉकडाउन हटवण्यात येत आहे. लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण होत आहेत. पण, जे अपेक्षित पंतप्रधानांना होते, ते परिणाम न मिळाल्यामुळे आता पुढे सरकार काय करणार आहे. कारण लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येविषयी भूमिका मांडली. कोरोनाचा प्रसार दाट वसाहत असलेल्या ठिकाणी जास्त होत असल्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. आम्ही महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण मोठे निर्णय घेण्याएवढे अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. अस असले तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Comment