इस्लामोफोबियाप्रकरणी स्वतःच तोंडघशी पडला पाकिस्तान


नवी दिल्ली – इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) भारतावर इस्लामोफोबियाचा आरोप करुन कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेला पाकिस्तान स्वतःच तोंडघशी पडला आहे. कारण ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी या प्रकरणी भारताची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरमी मालदीवसह सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने भारताची बाजू उचलून धरल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्लामोफोबियाचा प्रचार केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतावर केला होता. पण आयओसीमधील अनेक सदस्य देशांनी याप्रकरणी भारताचे समर्थन केले आहे. भारताच्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत वाढत असलेल्या व्यापारी संबंधांशिवाय भारताचे इस्लामिक देशांमध्ये स्थान उत्तम होत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. भारताचा हा अंतर्गत मुद्दा असल्याचे मित्रदेश असलेल्या ओमाननेदेखील म्हटले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताविरोधात केलेल्या आरोपांवर अन्य देशांनी आपल्या प्रतिक्रियाच दिल्या नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घातल असल्याचा आरोप केला होता. परंतु याचे खंडन करत मालदीवने भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असल्याचे म्हटले होते. तसेच २० कोटीहून अधिक मुस्लिम भारतात वास्तव्य करत असून असा आरोप भारतावर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर दक्षिण आशियाई क्षेत्रात अशा प्रकारचा आरोप करणे हे धार्मिक एकतेसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांसारख्या देशांशी इस्लामिक राष्ट्रांशी भारताने आपले संबंध अधिक दृढ केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशांनी त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. दक्षिण आशियातील सर्व देशांसोबत मिळून पाकिस्तानने काम करणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेत बदलही केला पाहिजे, असेही मालदीवने म्हटले होते.

Leave a Comment