देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली गोड बातमी; चार भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात


नवी दिल्ली – देशाभोवती कोरोनाचा फार्स दिवसेंदिवस घट्ट आवळला जात असून केंद्र तसेच देशभरातील विविध राज्य सरकारकडून अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच या जीवघेण्या रोगाची प्रतिबंधक लस तयार करण्यावरही देशातील वैज्ञानिक दिवसरात्र काम करत आहेत. त्यातच एक गोड बातमी समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे देशातील १४ ठिकाणी काम सुरू असून त्यापैकी ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावरून संवाद साधला. ४ लसींचे पाच महिन्यांच्या आत क्लिनिकल ट्रायल केले जाऊ शकते, असे हर्षवर्धन म्हणाले. राव यांनी चर्चेदरम्यान कोरोनाच्या लसीबद्दल त्यांना माहिती विचारली. कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जग करत आहे. १०० पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत आणि हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. या प्रयत्नांचे संयोजन जागतिक आरोग्य संघटना करत आहे. यावरील लस शोधण्यात भारतदेखील सक्रीयरित्या काम करत आहे. भारतात १४ ठिकाणी यावर काम सुरू असून ते सध्या निरनिराळ्या टप्प्यात असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग मदत करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशातील १४ पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर असल्याचे हर्षवर्धन म्हणाले. त्याचबरोबर सध्याच्या घडीला कोणत्याही लसीची अपेक्षा करणे ही घाई ठरू शकते, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणे ही मोठी प्रक्रिया आहे. लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी एखादे वर्ष देखील लागू शकते.

Leave a Comment