तज्ज्ञांचा भारताला इशारा; जूनमध्ये कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा


नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असून त्यातच मागील 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 हजार 977 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे देशात आतापर्यंत 1 लाख 38 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी 6 हजार नवीन कोरोनाबाधित समोर आले होते तर शनिवारी 6 हजार 654 आणि रविवार 6 हजार 767 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण देशाची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत देशाचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे सरकारला नाईलाजास्तव चौथ्या टप्प्यातील आपले काही नियम शिथिल करावे लागले. पण त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान हा आकडा येत्या काही आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते नवीन रुग्णांच्या संख्येत जूनमध्ये सर्वात जास्त वाढ होऊ शकते.

कोरोना रुग्णांची वाढ होत असली तरी भारताला त्याचा धोका नसेल. कारण भारतातील मृत्यू दर हा खूप कमी आहे. दरम्यान कोरोनाच्या या पॅटर्नचा जगभरातील तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे. यानुसार एकदा हा ग्राफ वाढल्यानंतर दोन महिन्यात रुग्णांची संख्या जास्त असते, मात्र त्यानंतर हा ग्राफ खाली आला आहे. मार्च महिन्यात इरानमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण होते. पण एप्रिलनंतर रुग्णांची संख्या कमी झाली. दरम्यान भारतात मे महिन्यात रुग्णांची वाढलेली संख्या हा लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याचा परिणाम असू शकतो.

दरम्यान कोरोना मॉडेलद्वारे मिशिगन युनिव्हर्सिटी (University of Michigan) आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं (Johns Hopkins University) चेतावणी दिली आहे की, भारतात जुलैच्या पहिल्या आठवड्यात 21 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होऊ शकतात, शक्यता मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सकडे व्यक्त केली. येत्या काळात भारतातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, अद्याप भारतात संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणे दर 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत.

भारतातील आरोग्य सेवा आणि रुग्णालयात कमी बेड व व्हेंटिलेटरबाबत जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या टीमने चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतातील रूग्णालयात सध्या सुमारे 7 लाख 14 हजार बेड आहेत, तर ही संख्या 2009 मध्ये सुमारे 5 लाख 40 हजार होती.

Leave a Comment