अभिनेता सोनू सूदचे भाजप नेत्यांनी मानले आभार


अभिनेता सोनू सूदने लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत करत असल्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच भाजप खासदार रविकिशन यांनी त्याचे आभार मानत कौतुक केले आहे. सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरितांसाठी बसेसची व्यवस्था करत असून आपल्या राज्यात त्यांना पाठवत आहे. बसेससोबतच त्यांच्या जेवणाचा सगळा खर्च सोनू सूद आपल्या परीने करत आहे. सोनू सूदकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातीलही काही स्थलांतरित ट्विट करुन मदत मागत आहेत. विशेष येणाऱ्या प्रत्येक ट्विटला सोनू सूद उत्तर देत आहे आणि त्यांना नक्की मदत मिळेल याची खात्री देत आहे.


सोनू सूदने दिलेले असेच एक उत्तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रिट्विट केले असून त्यांनी सोनू सूदचे स्थलांतरित मजूर तसेच गरजवंतांना मदत करत असल्याबद्दल आभार मानले आहेत. एक सहकारी म्हणून जवळपास दोन दशकांपासून तुला ओळखण्याचे भाग्य मला लाभले आहे. तुला एक अभिनेता म्हणून मोठे होताना पाहिले आहे. पण या कठीण काळात तू दाखवलेल्या माणुसकीमुळे तो अभिमान कायम ठेवला आहे. गरजूंची मदत केल्याबद्दल तुझे आभार, अशा आशयाचे ट्विट स्मृती इराणी यांनी केले आहे. त्याचबरोबर स्मृती इराणींच्या ट्विटला उत्तर देत अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनीदेखील सोनू सूदचे कौतुक करत जगात हेच तर लक्षात राहते, असे ट्विट केले आहे.

Leave a Comment