…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल – संजय राऊत


मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपआपल्या जिल्ह्यात गुंतले आहेत. मागील तीन महिन्यांपासून अनेक मंत्र्यांनी मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर मुख्यमंत्र्यांवर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी हे परखड मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरात व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. पण, त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले.

महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी त्यांची सध्याची अवस्था आहे. मलईदार खात्यांसाठी जे भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर मुख्यमंत्र्यांवर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांनी एक पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी त्यात सुचवले. यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा तीळपापड झाला असून यावर त्यांनी पवारांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे असा त्रागा केला. पंतप्रधानांना पवारांनी पत्र लिहिले हा त्यांचा अनुभव. मग विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांना आपल्याच पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापासून कोणी रोखले? फडणवीस व त्यांचे सहकारी राज्यपाल, पंतप्रधानांशी बोलतात ते फक्त सरकारच्या अपयशाबाबत. राज्य सरकार बरखास्त करा हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे.

बदलत्या संदर्भात विरोधी पक्षाने थोडे सबुरीने घेतले तर त्यांचे संकटही दूर होईल. त्यांचे ‘लॉकडाउन’ही संपेल. समाज माध्यमांवर आज सर्वाधिक टवाळी विरोधी पक्षाचीच सुरू आहे. हे चित्र बरे नाही. राज्यपालांना फडणवीस हे वारंवार भेटतात त्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्री व शरद पवार यांना भेटून कोरोना संकटावर चर्चा केली पाहिजे. ते का होत नाही? असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला.

‘वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करावे आणि सुरक्षित राहावे हा विचार वाढतो आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांनी घरातून काम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल असा इशारा दिला आहे. तो खरा मानला तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर ‘कोरोना’ काळात परिणाम झाला हे जाणवू लागले आहे. विरोधकांना लोकांनी घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधात काम करीत असल्याचा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.

महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजभवनाची पायरी चढतो आहे, आंदोलने करतो आहे. अपयशाचे म्हणायचे तर मग कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे लागेल. पंतप्रधान म्हणून मोदी व गृहमंत्री म्हणून अमित शहांची येथे जबाबदारी येतेच. महाराष्ट्रात संकट आहेच. तसे ते इतरत्रही आहे व सगळे एकाच बोटीतून प्रवास करीत आहेत. इतर राज्यांतील कानडी बांधवांना कर्नाटकचे सरकारही आपल्या राज्यात येऊ देत नाही. कोरोनाशी लढण्याचा हाच एकमेव उपाय आहे काय? लोक दारात उभी आहेत. गाव आणि घर त्यांचेच आहे. त्यांच्या घराचे सरकार कधी मालक झाले? असा सवालही राऊतांनी उपस्थितीत केला.

Leave a Comment