महाविकास आघाडीचे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार नाही


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यात सध्या कोरोनाचा गुणाकार सुरु असून पुढील काही काळात हा धोका खूप वाढणार आहे. पण घाबरुन जाऊ नका, यापुढे आपल्याला काही काळ कोरोनासोबतच जगावे लागणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्याकरिता केंद्रासह राज्यातील आरोग्य व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यावर मोठे संकट कोसळले असताना विरोधी पक्ष असलेला भाजप राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे. राज्यपालांकडे तक्रार करत आहे. पण त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पोकळ घोषणा करणारे नाही. त्याचबरोबर राज्याला विशेष पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची सध्या गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पॅकेजची मागणी धुडकावून लावली.

मुख्यमंत्र्यानी सांगितले की, योग्य ती व्यवस्था सर्व परप्रांतीय मजुरांची करण्यात आली. मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतले नाही. राज्याने केंद्राची वाट न बघता हा सर्व खर्च केला, असा भाजपला टोला लगावला. आपण इतर राज्यातील मजुरांना जा असे सांगितलेले नाही. त्यांना घरी जायचे होते, आपण यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली पण तेव्हा मिळाली नाही. आता कोरोनाचं संकट वाढल्यानंतर ही परवानगी मिळाली. आतापर्यंत राज्याने 481 ट्रेन सोडल्या. यातून 7 लाखापर्यंत मजूर आपापल्या गावी पोहोचले. 75 कोटी रुपये राज्य सरकारने यासाठी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्याने मजूर निघाले होते. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना एसटीने स्थानकापर्यंत तसेच परराज्यापर्यंत सोडण्यात आले. 5 ते 23 मेपर्यंत एसटीच्या सुमारे 32 हजार फेऱ्या झाल्या. यामध्ये एसटीच्या माध्यमातून जवळपास 4 लाख मजुरांना जवळचे स्थानक तसेच घरापर्यंत सोडण्यात आले. याकामात राज्य सरकारने 75 कोटी खर्च केला आहे.