मुंबई – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव कामरान अमीन असे असून ही कारवाई एटीएसच्या काळाचौकी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक
उत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर कामरानने फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी यानंतर लखनऊमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याविषयी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
कामरानने धमकीचा फोन केल्यानंतर आपला मोबाईल बंद ठेवला होता. पण पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या आधारावर हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी भागात शेवटचा स्विच ऑन केला गेला होता हे शोधून काढल्यानंतर चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता, कामरान अमीनचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कामरानला अटक केली आहे. कामरानने आपला एटीएस अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे.