उद्यापासून सुरु होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेला गृहमंत्री अनिल देशमुखांचा विरोध


मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होणार असल्याचे जाहिर केल्यानंतर आता देशातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असे असले तरी विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विरोध केला आहे.

त्यांनी याबाबत मध्यरात्री ट्विट करत विमानसेवा सुरु करणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अशा परिस्थितीमध्ये रेड झोनमधील विमानतळ सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅबशिवाय प्रवाशांचे नुसते थर्मल स्कॅनिंग करुन काय फायदा होईल? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. रेड झोनमध्ये पॉझिटिव्ह प्रवाशाला आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.


रेड झोनमध्ये ग्रीन झोन मधील प्रवाशांना आणून प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यस्त विमानतळांना सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असे देखील अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

उद्या, 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही आता उत्सुकता आहे. ऑगस्ट महिन्याच्या आधी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न करू असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment