जमावाने लुटले होते 30 हजारांचे आंबे, आता त्या फळविक्रेत्याला लोकांनी केली लाखोंची मदत

काही दिवसांपुर्वी दिल्लीच्या जगतपुरी भागातील एका फळविक्रेतेचे जमावाने 30 हजार रुपयांचे आंबे लुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मीडियाने या बाबत बातम्या दिल्या होत्या. यानंतर आता देशभरातून अनेकांनी फळविक्रेता फूल मियां उर्फ छोटेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत 8 लाख रुपयांची मदत छोटेला मिळाली आहे. या मदतीसाठी छोटेने मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

व्हिडीओ : जमावाने लुटले गरीबाचे 30 हजार रुपयांचे आंबे

छोटे अनेक वर्षांपासून हातगाडी लावून फळ विकण्याचे काम करतात. ते दिल्लीच्या जगतपुरी भागात राहतात. काही दिवसांपुर्वीच आजुबाजूच्या लोकांनी त्याला त्याची हातगाडी चंद्र नगर येथून हटविण्यास सांगितले. या लोकांशी वाद घालत असताना, अचानक काही आजुबाजूच्या लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेत पेटीमध्ये ठेवलेले आंबे लंपास करण्यास सुरूवात केली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आजुबाजूची लोक कॅरेट्समधून आंबे लुटून नेत असल्याचे दिसत आहे. या घटनेत छोटेचे तब्बल 30 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून लोकांनी त्याची मदत केली. आतापर्यंत त्याला 8 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. सर्वांचे आभार मानत, आता ईद आनंदाने साजरी करेल, असे छोटे म्हणाला.

Leave a Comment