मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे जगभरातील सर्वच देश हतबल झाले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाखांच्यावर पोहचला आहे. जगात मागील 24 तासात 97897 कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण जगभरातील 54,01,612 लोकांना झाली असून आतापर्यंत 3,43,804 लाखाहून अधिक लोकांची बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 22,47,151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांच्या घरात आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 1,31,423 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 3,868 बळी गेले आहेत. सध्या भारतात 73,170 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 54,385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर कायम; बाधितांचा आकडा 54 लाखांवर
अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 16,66,828 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 98,683 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,675 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,57,154 एवढी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 3,47,398 कोरोनाबाधित आहेत तर 22013 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 28,678 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमधील 2,82,370 लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,735 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,29,327 एवढा आहे.
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 98 हजारांवर गेला आहे.