सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी सांगितली कोरोनाची एक्सपायरी डेट


लंडन : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून आतापर्यंत जगभरातील 53 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर यामुळे 3 लाख 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अहोरात्र संशोधन करत असतानाच सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची एक्सपायरी डेट सांगितली आहे.

जगभरातील काही देशांबाबत सिंगापूरच्या काही शास्त्रज्ञांनी भाकित केले असून त्यानुसार ब्रिटनमधून 30 सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा नायनाट होणार असल्याचे सांगितले आहे. काही तारखा सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनच्या (SUTD) शास्त्रज्ञांनी आपल्या एका अभ्यासात जाहीर केल्या आहेत. यात ब्रिटनमधून पुढील 4 महिन्यात कोरोनाचा नायनाट होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. 7 मे रोजी या तारखांबाबत शास्त्रज्ञांनी माहिती दिली होती. त्यावेळी कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये जवळजवळ 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

शास्त्रज्ञांनी यानंतर इतर काही देशांमध्येही व्हायरसचा संसर्ग पूर्णपणे संपुष्टात येईल. इतर काही देशांबाबत शास्त्रज्ञांनी 8 मे रोजी अंदाज वर्तवला. यानुसार इटलीमध्ये 24 ऑक्टोबरपर्यंत कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होईल, असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. तर, अमेरिकेत 11 नोव्हेंबरपर्यंत व्हायरसचा अंत होईल. त्याचप्रमाणे 27 ऑक्टोबरपर्यंत सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेल. शास्त्रज्ञांनी या भविष्यवाणीनंतरही लोकांना कोरोना विषयक काळजी घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात द सनच्या एका वृत्तानुसार, जर संक्रमण आणि मृत्यूचा हा दर कायम राहिला तर जून अखेरीस या आजारामुळे मृतांची संख्या कमी होईल, असे सेंटर फॉर एविडेंस बेस्ड मेडिसीनच्या प्राध्यापकाने म्हटले आहे.

Leave a Comment