सिनेअभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण


हिंदीसह अनेक भाषेतील चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतचा खुलासा त्यांनी स्वतः एबीपी न्यूज या वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे. लक्षणे नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवता घरीच ठेवले आहे. त्याचबरोबर आपण ठीक असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे किरण कुमार यांनी म्हटले आहे.

एबीपी न्यूज या वृत्त वाहिनीशी फोनवर झालेल्या संवादात किरण कुमार यांनी म्हटले की, मला मुंबईतील एका दवाखान्यात काही उपचारासाठी जायचे होते. माझ्या काही टेस्ट त्यासाठी घेतल्या. त्यात कोविड-19 टेस्ट देखील घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट 14 मे रोजी आला. त्यात मी कोरोनाबाधित असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना किरण कुमार म्हणाले की, माझ्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. त्याचबरोबर सर्दी, ताप, खोकला तसेच कुठलेही दुखणे नाही. एसिम्टमॅटिक असल्यामुळे मला हॉस्पिटलला भरती होण्याची गरज पडली नाही. सध्या मी सेल्फ आयसोलेशनमध्ये माझ्या दोन मजली घरात आरामात राहत असल्याचे ते म्हणाले.

माझे घर खूप मोठे असल्यामुळे मी वरच्या मजल्यावर सर्व नियमांचे पालन करुन एकटाच राहात आहे. तर खालच्या मजल्यावर माझे कुटुंब राहात आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नाही, माझी प्रकृती एकदम ठीक असल्याचे किरण कुमार यांनी म्हटले आहे. किरण‌ कुमार यांची पुढील कोरोना टेस्ट 26 मे रोजी होणार आहे.

Leave a Comment