नवी दिल्ली – सर्व जगावर वर्चस्व गाजवण्याचे चीनचे जुने स्वप्न आहे. पण चीनचे ते स्वप्न भारतामुळे स्वप्नच राहणार आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी चीनची पुन्हा वळवळ सुरु झाल्यामुळे सध्या लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून या क्षेत्रात होणाऱ्या वारंवार घुसखोरीच्या घटनांच्या आलेखावर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येत आहे. लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत भारत आणि चीनमध्ये सीमारेषा आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
भारताच्या ताब्यात असलेल्या ‘त्या’ चार भागांवर चिनी ड्रॅगनची नजर
भारतीय हद्दीत २०१५ पासून चीनने केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर चीनने केलेल्या ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरत्याच मर्यादीत आहेत. यातील तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधील आहेत. पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते.
चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये घडल्या आहेत. दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये २०१९ पासून चीनने घुसखोरी सुरु केली. चीनने २०१९ मध्ये तेथे तब्बल ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.
लडाख आणि सिक्कीममध्ये भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा हा चीनचा आरोप भारताने फेटाळून लावला. उलट आपल्या हद्दीत भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप भारताने केला आहे.
आम्ही सीमेवर शातंता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. पण देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व आवश्यक पावले उचलू असे भारताने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे विधान नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केले. लडाखच्या गालवान व्हॅली भागात जास्त तणाव आहे. येथे दोन्ही देशांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत.
त्यातच अमेरिकेने म्हटले चीनकडून होत असलेल्या कुरापतींमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अॅलिस वेल्स यांनी ही टीका दक्षिण व मध्य आशियासाठी केली आहे.
चीनची आक्रमकता दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत असून त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होत असल्याचे अॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या होत्या.