समाज भान जपणाऱ्या सोनू सुदचे जयंत पाटलांकडून कौतुक


मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहिर केला असून सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना पहिल्या दोन टप्प्यांत प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. पण लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे या मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या. अखेरीस या मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासाची परवानगी दिली. त्याचबरोबर रेल्वे विभागातर्फे या मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. लॉकडाऊनच्या या काळात सरकारप्रमाणेच समाजातील अनेक लोक आपल्या कुवतीनुसार कामगारांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.


अभिनेता सोनू सुदने देखील अनेक कामगारांना या काळात आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली. सोनूने काही दिवसांपूर्वी मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बसची सोय केली. राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी त्याच्या याच कामाचे कौतुक केले आहे. पडद्यावर खलनायकाचे काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचे काम करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सोनू सुदने याआधी देखील कोरोनाविरुद्ध लढ्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. सोनूने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते डॉक्टरांना PPE किट देण्यापर्यंत आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली आहे आणि तो अद्यापही घरी जाणाऱ्या कामगार व मजुरांना मदत करत आहे.

Leave a Comment