मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आणि निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांवर आधीच कर्ज असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. राज्य सरकारने अशावेळी एक महत्वाचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील साधारण ११ लाख शेतकर्यांना नवीन कर्ज मिळू शकणार आहे. या नवीन निर्णयाचे वैशिष्ट्य म्हणजे खरीपाचे नवीन कर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने त्यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी घेतली आहे.
राज्यातील शेतकर्यांना थकबाकीदार असूनही मिळणार नवे कर्ज
राज्य सरकारने बँकांना खरीप हंगामासाठी या थकीत ११.१२ लाख शेतकर्यांना नवीन कर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या नावे या शेतकर्यांच्या कर्जाची थकीत रक्कम करून त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचा स्पष्ट उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे ११.१२ लाख शेतकर्यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये व्याजासह बँकांना राज्य सरकार देणार आहे.
राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली असून या कर्जमाफी योजनेचा राज्यातील ३२ लाख शेतकर्यांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने जमा केले आहेत. पण निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती. ८१०० कोटी लाभ या खातेदारांना देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिला आहे.